औरंगाबाद- गुरुवारी तळकोकणात दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी पावसाने शुक्रवारी किंचित प्रगती केली आहे. येत्या दोन दिवसांत मान्सून मुंबईसह मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत पोहोचण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गुरुवारी व शुक्रवारी कोकणात जोरदार पाऊस झाला, तर पूर्वमोसमी पावसाने मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात सर्वदूर हजेरी लावली. दरम्यान, १० ते १३ जून या काळात राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
हवामान खात्याच्या मते, शुक्रवारी नैऋत्य मोसमी पाऊस कोकण, अंतर्गत कर्नाटक, रायलसीमा व अांध्र प्रदेश किनारपट्टीच्या आणखी काही भागांत दाखल झाला. येत्या दोन -तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात बहुतांश भागात दाखल होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात पाऊस
शुक्रवारी औरंगाबाद, वैजापूर, गंगापूर, जालना, बदनापूर, मंठा, अंबड, घनसावंगी, हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, वसमत, औंढा नागनाथ, किनवट, माहूर, हदगाव, पाटोदा, आष्टी, लातूर, औसा, रेणापूर, चाकूर, निलंगा, उस्मानाबाद, कळंब, भूम, वाशी तालुक्यांत हलका पूर्वमोसमी पाऊस झाला.

No comments:
Post a Comment