बीजिंग, दि. १८ - डोकलाममधील चीनच्या विस्तारवादी धोरणास भारतीय लष्कराने आडकाठी केल्याने चवताळलेल्या चीनकडून देण्यात येत असलेल्या धमक्यांची मालिका सुरूच आहे. आता डोकलाममधील वाद चिघळल्यास भीषण युद्ध होईल, अशी धमकी चीनी प्रसारमाध्यमांनी भारताला दिली आहे. डोकलाममध्ये भारताकडून कडवा प्रतिकार होईल अशी अपेक्षा चीनला नव्हती. मात्र महिनाभर वादविवाद चालल्यानंतरही भारत एक पाऊलही मागे न हटल्याने ड्रॅगनची आग झाली आहे.
सिक्कीमला लागून असलेल्या डोकलाम परिसरातील वाद निवळण्याची चिन्हे दिसत नसल्याने चीनी माध्यमांनी सरकारला सावध केले आहे. भारतासोबत दोन हात करण्यासाठी चीनने तयार राहिले पाहिजे असे सरकारी पत्र ग्लोबल टाइम्सने चीन सरकारला सांगितले आहे. तसेच अशा मतभेदांमुळे दोन्ही देशांच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भीषण युद्ध होऊ शकते, असा इशाराही या वृत्तपत्राने भारताला दिला आहे.
भारताने डोकलाममध्ये चिनी लष्कराला रस्ता बनवण्यापासून रोखून चीनच्या सार्वभौमत्वाचा अपमान केला आहे, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. चीन बनवत असलेला रस्ता हा भारत, भूतान आणि चीनच्या संयुक्त सीमेवर आहे. भारताने येथील रस्त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. हा रस्ता बांधून पूर्ण झाल्यास या मार्गाच्या मदतीने चीनी सैन्य भारताचा पूर्वेकडील राज्यांशी असलेला संपर्क तोडू शकतो. अशी भारताला भीती आहे. असेही ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत भारत आणि चीनमध्ये तीन हजार ४८८ किमी लांब सीमा आहे. त्यातील २२० किमी सीमा ही सिक्कीमला लागून आहे. अशा परिस्थितीत डोकलाम विवाद दीर्घकाळ चालण्याची शक्यता लक्षात घेऊन चीनने तार्किक भूमिका घेतली पाहिज असा सल्ला, ग्लोबल टाइम्सने दिला आहे.
सिक्किम सेक्टरमधील जवळपास 10 हजार फूट उंचीवर भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. भारतीय सैन्याने मागे हटावे, यासाठी चीनकडून वारंवार इशारे देण्यात आले आहेत. मात्र तरीही भारतीय सैन्याचे जवान सिक्किम सेक्टरमध्ये पाय रोवून उभे आहेत.भारतीय लष्कराच्या जवानांनी जवळपास 10 हजार फुट उंच या वादग्रस्त भागात तंबू गाडले आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान तेथून सरकणार नाही, तोपर्यंत आपणही माघार घेणार नाही असा संकल्प या सैनिकांनी घेतला आहे. दरम्यान, भारतीय जवानांनी या परिसरात तंबू ठोकल्यानंतर आता चीननेही येथे दीर्घकाळ उभे राहण्याच्या इराद्याने तळ ठोकला.
No comments:
Post a Comment