Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Friday, June 30, 2017

तेलंगणातील मराठमोळे IPS अधिकारी महेश भागवत यांचा अमेरिकेत गौरव



हैदराबाद, दि. 29 - तेलंगणामधील मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश मुरलीधर भागवत यांचा अमेरिकेनं बहुसन्मान केला आहे.  अमेरिकेने ‘ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो अॅवार्ड’ देऊन महेश मुरलीधर यांचा गौरव केला आहे.  महेश भागवत आता हैदराबादमधील राचकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. 
 
महेश भागवत हे गेल्या 13 वर्षांपासून मानवी तस्करीविरोधात लढत आहेत. या तेरा वर्षांमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणात त्यांनी व त्यांच्या पथकासोबत शेकडो बालमजुरांची सुटका केली. शिवाय तेथील देहविक्री व्यवसायदेखील बंद केलेत. 
 
यावेळी तेलंगणामधील मानवी तस्करीसोबत संबंध आलेल्या पुणे, बंगळुरू, दिल्ली तसंच सिंगापूर येथील केंद्रावरही महेश भागवत आणि त्यांच्या पथकानं कारवाई केली आहे. ही कारवाई करताना भागवत अडथळ्यांना, विरोधकांना, जीवघेण्या धमक्यांना घाबरले नाहीत. आपले कार्य सुरू ठेवत त्यांनी पीडितांना वाचवले, आरोपींना शासन केलं आणि जगजागृती करण्याचे आपले काम कायम सुरू ठेवले. 
 
मानवी तस्कराविरोधात लढा देणा-या महेश भागवत यांनी आतापर्यंत शेकडो  पीडितांची अन्य सरकारी विभाग आणि नागरी संस्थांच्या मदतीनं सुखरुप सुटका केली आहे. एवढंच नाही तर त्यांचे योग्य पद्धतीनं पुनर्वसन होईल याची काळजीही घेतली. 
 
अमेरिककडून करण्यात आलेल्या बहुसन्मानाबाबत बोलताना महेश भागवत म्हणाले की, ''गेली तेरा वर्षे अँटी ट्रफिकिंग मोहिमेमध्ये मी काम करत आहे, त्या कामाबद्दल 27 तारखेस अमेरिकेत पुरस्कार दिला गेला. या तेरा वर्षांमध्ये सध्याच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यातील आमच्या चमुने शेकडो बालमजुरांची सुटका केली. तसेच अनेक वेश्यागृहेदेखील बंद केली. तसेच यासंदर्भात तेलंगणमधील ट्रॅफिकिंगशी संबंध आलेल्या पुणे, बंगळुरु, दिल्ली व सिंगापूर येथील केंद्रावरही आम्ही कारवाई केली. मानव तस्करीविरोधातील या कार्याला मिळालेला हा पुरस्कार आमचा हुरुप वाढवणारा असून या कामाला जागतिक मान्यता मिळाली असे मला वाटते. या विषयावर मी लिहिलेली पुस्तके भारत सरकारचे गृह मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्रतरफे प्रसिद्धही झाले आहे''.
 
महेश भागवत हे महाराष्ट्रातील मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.  गेल्या 13 वर्षापासून ते मानवी तस्करीविरोधात कार्य करत आहेत.

https://www.facebook.com/photo.php?fbid=10212297293801771&set=a.2781187723139.140326.1061559081&type=3

No comments:

Post a Comment