मुंबई हे शहर दिल्लीच्या तुलनेत महिलांसाठी सुरक्षित मानलं जातं. असं असलं तरीही महिला आणि मुली यांना मुंबईत छेडछाड, बलात्कार, विनयभंग अशा प्रकारांना अनेकदा सामोरे जावे लागते. आता अशात मुंबईतल्या लोकलमध्ये आलेला धक्कादायक आणि किळसवाणा अनुभव एका २२ वर्षीय तरूणीने फेसबुकवर पोस्ट केला आहे. ही मुलगी बोरिवलीहून चर्चगेटकडे चालली होती. ही मुलगी महिला डब्यातून प्रवास करत होती. तिची ट्रेन कांदिवलीला आली असता तिचं लक्ष समोरच्या डब्यात असलेल्या तरूणाकडे गेलं. तो तरुण तिच्याचकडे रोखून बघत होता, त्यानंतर या मुलीनं तो काय करतो आहे हे पाहायला सुरुवात केली.
यानंतर तिला जो अनुभव आला तो खरंच भयंकर होता असं तिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे, आधी या तरूणानं तिला शिव्या द्यायला सुरूवात केली. त्यानंतर चक्क पँटची झिप उघडून तिच्यादेखतच त्या तरूणानं हस्तमैथुन करायला सुरूवात केली. पुढचं स्टेशन येताच या तरूणानं पीडित मुलीला बलात्कार करण्याचीही धमकी दिली. तसंच लेडिज डब्यात शिरून त्यानं मला बाहेर खेचण्याचाही प्रयत्न केला. मात्र डब्यात असलेल्या इतर महिलांनी आरडाओरडा केला आणि त्यामुळे त्यानं हा प्रयत्न सोडून दिला असंही या पीडित मुलीनं आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं आहे.
या सगळ्या प्रकाराची त्या तरूणीला किळस तर आलीच शिवाय चीडही आली. पण तिनं घाबरुन न जाता त्या तरूणाचा फोटो काढला आणि तो घेऊन ती रेल्वेच्या महिला हेल्पलाईन विभागाकडे गेली ज्यानंतर तिची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी महिला रेल्वे हेल्पलाईनचे कर्मचारी चक्क हसू लागले आणि त्यांनी तक्रार करणाऱ्या मुलीचीच खिल्ली उडवली. या सगळ्या प्रकारामुळे पीडित मुलगी काहीशी गोंधळून गेली… पण तिनं आपला सगळा अनुभव फेसबुकवर शेअर केला आणि त्या लिंगपिसाट तरूणाचा फोटोही शेअर केला, ज्यानंतर तिच्या या फेसबुक पोस्टवर अनेक कमेंट आल्या ज्यामध्येही अनेक मुलींनी आपल्याला आलेले अनुभव लिहीले आहेत. तर अनेक नेटिझन्सनी या घटनेचा निषेध केला आहे.
मुली आणि महिलांच्या सुरक्षेसाठी महिला रेल्वे हेल्पलाईन नंबर देण्यात आले आहेत तसंच हा विभागही प्रामुख्यानं त्यांच्यासाठीच काम करतो. असं असतानाही एखाद्या मुलीची अशा प्रकारे थट्टा करणं हे रेल्वे हेल्पलाईनच्या कर्मचाऱ्यांना कसं काय शोभतं हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. दुपारी ३.वाजून ३८ मिनिटांनी चर्चगेटच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका २२ वर्षीय मुलीनं हा धक्कादायक अनुभव घेतला आहे. तिचा हा अनुभव तिनं फेसबुकवरही शेअर केला आहे. तसंच या लिंगपिसाट तरूणाचा फोटोही पोस्ट केला आहे असं सगळं असतानाही पोलीस आणि रेल्वे पोलीस काय करत आहेत हा प्रश्न कायम आहे.
आज एका तरूणीला असा अनुभव आला, उद्या कदाचित आणखी कोणालाही असा किंवा याहीपेक्षा जास्त वाईट आणि किळसवाणा अनुभव येऊ शकतो. अगदी एखाद्या मुलीवर किंवा महिलेवर बलात्कारही होऊ शकतो त्यानंतर पोलिसांना जाग येणार आहे का? असा प्रश्न आता महिलांना पडला आहे. मुंबईतली लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते, रोज हजारो लाखो स्त्रियांना या ट्रेनचाच आधार असतो, अशात त्यांनाच जर असे अनुभव आले तर त्यांची क्रूर चेष्टाच केली जाणार का? असाही सूर लोकलनं प्रवास करणाऱ्या महिला आणि मुलींकडून उमटतो आहे.
No comments:
Post a Comment