पिंपरी-चिंचवड शहरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या पिंपळे सौदागर परिसरात ‘मसाज सेंटर’च्या नावाखाली सुरू असलेल्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. फोरच्युना प्लाझामधील ‘चिवा स्पॉ’वर छापा टाकून थायलंडच्या पाच तरुणींची सुटका केली, तर दोघांना अटक केली आहे. ही कामगिरी सामजिक सुरक्षा आणि सांगवी पोलिसांनी संयुक्तरीत्या केली आहे.
अमोल खंडू जाधव (31, रा. पिंपळे सौदागर) आणि दिलू गुआनबे जिबा हौ (21, रा. मुंढवा, मूळ नागालँड) या दोघांना अटक केली आहे. ‘पिंपरी-चिंचवड शहरातील ‘मसाज सेंटर’ बनतात अवैध धंद्यांची केंद्रे’ या मथळ्याखाली ‘पुढारी’त सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.
यानंतर गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा विभाग आणि स्थानिक पोलिसांनी याची दखल घेत बनावट गिर्हाईक पाठवून माहिती गोळा केली. सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत फोरच्युना प्लाझा येथे मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शुक्रवारी (दि. 29) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास मसाज सेंटरमध्ये छापा टाकला, त्या वेळी त्या ठिकाणी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना संशयास्पद अनेक वस्तू मिळाल्या आहेत. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेल्या थायलंडच्या पाच तरुणींकडून हे दोघे वेश्याव्यवसाय करून घेत होते.
या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का, याचा पोलिस अधिक तपास करत आहेत. ही कामगिरी पोलिस निरीक्षक संजय पाटील, अरविंद जोंधळे, सहायक निरीक्षक शीतल भालेकर, चंद्रकांत जाधव, नितीन लोंढे, संदीप गायकवाड, संजय गिरमे, रमेश लोहकरे, नितीन तेलंगे, गितांजली जाधव, कविता नलावडे, सरस्वती कागणे, ननिता येळे या पथकाने केली आहे.

No comments:
Post a Comment