Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Wednesday, July 19, 2017

नियमांचं उल्लंघन करताना सावधान, पोलिसांच्या छातीवर लागणार सीसीटीव्ही कॅमेरे


मुंबई, दि. 19 - अनेकदा वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्यानंतर पोलिसांनी अडवलं तर वाहनचालक हुज्जत घालत आपली काहीच चुकी नसल्याचा दावा करत असतात. वाहनचालक आणि पोलिसांमध्ये होणा-या शाब्दिक चकमकीचं रुपांतर अनकेदा हाणामारीतही होतं. वाहनचालकांनी पोलिसांवर हल्ला झालेल्या अनेक बातम्या याआधी समोर आल्या आहेत. मात्र यापुढे वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालताना किमान दहावेळा तरी नक्की विचार करा. कारण यापुढे वाहतूक पोलिसांच्या बॉडी कॅमेरा देण्यात येणार आहे. छातीवर बसवण्यात येणा-या कॅमे-यात कारवाई करत असतानाची तसंच दंड आकारत असतानाची रेकॉर्डिंग केली जाणार आहे. 

दादर आणि वरळीमधील वाहतूक पोलिसांना हे कॅमेरे देण्यात येणार आहेत. हातात काठी आणि वॉकीटॉकी घेऊन फिरणारे वाहतूक पोलीस यापुढे वायफाय कॅमेराही बाळगताना दिसतील. 
 
या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश वाहतूक चालकांचे पोलिसांसोबत होणारे वाद टाळणे असून, यंत्रणेत पारदर्शकता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या कॅमे-यामुळे खाकी वर्दीतील पोलीस एखाद्या व्यक्तीशी कशा प्रकारे संवाद साधतात किंवा त्यांचं वागणं कसं असतं यावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपुर्ण शहरातील पोलिसांना ही सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. 
 
प्रत्येक डिव्हाईसमध्ये आठ ते दहा तासांचं रेकॉर्डिंग करण्याची क्षमता आहे. फक्त वाहनचालकांविरोधात कारवाई करतानाच नाही, तर रस्त्यांवरील वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवतानाही कॅमेरा सुरु ठेवायचा आहे. 
 
'बॉडी कॅमे-यामुळे वाहतूक पोलिसांच्या कामात पारदर्शकता येईल, तसंच पोलिसांवर करण्यात येणा-या भ्रष्टाचाराच्या आरोपांची पडताळणी करणंही सोपं जाईल', असं एका अधिका-याने सांगितलं आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचा दुचाकीस्वाराच्या भावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेसाठी अशाप्रकारचे कॅमेरा देण्याचा निर्णय घेतला होता. 
 
काय झालं होतं नेमकं - 

23 ऑगस्ट 2016 रोजी खार एसव्ही रोडवरील पेट्रोल पंपावर डयुटीवर बजावत असताना विलास शिंदे यांनी तिथे आलेल्या दुचाकीस्वाराकडे त्याच्या गाडीची माहिती मागितली होती. पण शिंदे यांना माहिती देण्यास दुचाकीस्वाराने नकार दिला होता. दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यांनी दुचाकीस्वाराला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायची धमकी दिली. त्यानंतर संतापलेल्या दुचाकीस्वाराने शिंदे यांना मारहाण सुरु केली होती. तिथे असलेले एक लाकूड उचलून त्याने शिंदे यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला होता. शिंदे रक्ताच्या थारोळयात तिथे कोसळले. ते पाहून भेदरलेला दुचाकीस्वार तिथून पसार झाला. गंभीर अवस्थेत त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर मार लागल्याने ते बेशुद्धअवस्थेत होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी मालवणी येथून अटक केली होती.

No comments:

Post a Comment