Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Sunday, July 16, 2017

उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर


मुंबई : राज्यातील एक हजार उपसा जलसिंचन योजना ‘सोलर पार्क’च्या माध्यमातून सौरऊर्जेवर आणण्यासाठी लागणारे सहकार्य केंद्र सरकार देणार असल्याचे केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या बैठकीत सांगितले. यासंदर्भातील प्रकल्प अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी महावितरण आणि ईईएसएल यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करारही झाला.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. उपसा सिंचन योजनांमध्ये सौरऊर्जेचा वापर झाल्यास वीज बिलाचा भार कमी होईल. राज्याची ऊर्जाक्षेत्रात अधिक प्रगती आणि सहकार्य मिळावे म्हणून ईईएसएल या केंद्राच्या अखत्यारीतील संस्थेशी महावितरणचा सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत ईईएसएलतर्फे एनर्जी इफिशियन्सी पंप पुरविण्यात येणार आहेत. सुरुवातीला हा प्रकल्प प्रायोगिक स्तरावर राबविण्यात येणार आहे. या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, ईईएसएलचे सौरव कुमार यांनी स्वाक्षरी केली. ईईएसएलच्या सहकार्याने राज्यातील सबस्टेशनच्या जागेवर सौर प्रकल्प उभारून त्यात निर्माण होणारी वीज कृषी पंपांना देण्यात येणार आहे.
नंदुरबार, मेळघाट, गडचिरोली यासारख्या आदिवासी भागात स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही अजून वीज पोहोचली नाही. सर्वांसाठी वीज या धोरणानुसार आदिवासी कुटुंबांनाही वीज कनेक्शन मिळावे, अशी मागणी बावनकुळे यांनी केली. सुमारे १० लाख कुटुंबांना वीज देण्यासाठी लागणारे सहकार्य केंद्र सरकारतर्फे देण्यात येईल, असेही गोयल यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment