काठमांडू- परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी शुक्रवारी भूतानचे समकक्ष डामचो डोरजी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. त्याचबरोबर सिक्कीमच्या डोकलाममधील वादावर भूतानसोबतची ही पहिलीच उच्चस्तरीय बैठक होती.
बे ऑफ बंगालच्या तंत्रज्ञान, आर्थिक सहकार्यविषयक राष्ट्र परिषदेत सहभागी होण्यासाठी सुषमा स्वराज नेपाळ दौऱ्यावर दाखल झाल्या आहेत. परिषदेच्या पार्श्वभूमीवर उभय नेत्यांत ही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान, नेपाळ हे या संघटनेचे सदस्य आहेत. दोन्ही नेत्यांत झालेल्या चर्चेचा तपशील मात्र स्पष्ट करण्यात आला नाही. परंतु डोकलाममधील सद्य: परिस्थितीवर उभय नेत्यांनी परस्परांच्या चिंता व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. १६ जूनपासून सिक्कीममधील चिनी सैनिकांच्या तैनातीमुळे तणाव वाढला आहे. चीनच्या लिबरेशन आर्मीने या डोकलाम भागात रस्ते तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. डोकलाममध्ये चीनच्या सैन्याने काहीही आगळीक केली तरी त्यास तोंड देण्यास भारतीय सैन्य सज्ज आहे, असे जेटली म्हणाले.

No comments:
Post a Comment