Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Friday, June 30, 2017

तणाव वाढला! भारत-चीनने तैनात केले 3 हजार सैनिक



नवी दिल्ली, दि. 30 - सिक्कीममध्ये भारत-चीन सीमारेषेवर दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले असून, तणाव निवळण्याऐवजी उलट वाढत चालला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही देशांनी 3 हजार सैनिकांची तुकडी या भागात तैनात केली आहे. सिक्कीमच्या डोकलाम भागात भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा एकत्र येऊन मिळतात. या ठिकाणी भारत आणि चीनचे सैनिक परस्पराविरुद्ध उभे ठाकले असून, मागच्या अनेक दशकात प्रथमच इथे अशा प्रकारची युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 
 
लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी गुरुवारी गँगटोक येथील 17 माऊंटन डिविजन आणि कालीमपाँग येथील 27 माऊंट डिविजनच्या मुख्यालयाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. भारतानेही कणखर भूमिका घेतली असून, दोन्ही देश मागे हटायला तयार नाहीयत. दोन्ही सैन्याच्या लष्करी अधिका-यांमध्ये ध्वज बैठका आणि अन्य पातळीवर झालेल्या चर्चेचा काहीही उपयोग झालेला नाही. 
 
आपल्या भेटीत रावत यांनी 17 डिविजनच्या तैनातीचा आढावा घेतला. या डिविजनकडे पूर्व सिक्कीमच्या संरक्षणाची जबाबदारी असून, या डिविजनच्या चार ब्रिगेडमध्ये प्रत्येकी तीन हजार जवान आहेत. चीनच्या रस्ते बांधणीवर भारताने आक्षेप घेतल्यानंतर हा तणाव निर्माण झाला आहे. सिक्कीममध्ये तीन देशांच्या सीमा मिळतात त्या ट्राय जंक्शनपर्यंत तुम्हाला रस्ता बांधू देणार नाही हे भारताने स्पष्ट केले आहे. 
 

 
चीनला इथे क्लास-40 रस्ता बांधायचा आहे. याचा अर्थ युद्धकाळात या मार्गारुन चीनची 40 टन वजनाची लष्करी वाहने सहज ये-जा करु शकतात. ज्यामध्ये हलक्या रणगाडयांचा समावेश होतो. विकासापेक्षा चीनची रस्तेबांधणीमागे दुसरा इरादा असल्याने भारत आणि भूतान दोन्ही देशांनी चीनला कडाडून विरोध केला आहे. 
 
भारतावर दबाव आणण्यासाठी चीनकडून सातत्याने युद्धखोरीची भाषा केली जात आहे. ग्लोबल टाइम्स या चीनच्या सरकारी वर्तमानपत्रातील लेखातून दररोज इशारे दिले जात आहेत. युद्धाची खुमखुमी असलेल्यांनी इतिहास न विसरता त्यापासून धडा घ्यावा. भारतीय लष्करातील व्यक्ती इतिहासापासून नक्कीच काही तरी धडा घेतील आणि युद्धाच्या गर्जना थांबवतील असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी म्हटले आहे. 

No comments:

Post a Comment