मुंबई : निसर्गवाद्यांनी केलेल्या संशोधनात तब्बल 80 वर्षांनी अत्यंत दुर्मिळ असे अरिसामा ट्रान्सलुसन्स नावाचे फूल सापडले आहे. कोब्रा लिली या नावाने हे फूल ओळखले जाते. वनस्पतिशास्त्रज्ञ एडवर्ड बर्न्स यांनी प्रथम 1932 मध्ये भारताच्या दक्षिणेकडील निलगिरी पर्वतांमध्ये या फुलाचा शोध लावला होता.
कोब्रा लिली ह्या फुलाच्या वरील पाने अर्धपारदर्शक असल्याने आतील फुलांना सूर्यप्रकाश मिळतो. शास्त्रज्ञांनी 1933 मध्ये प्रथम या फुलाबाबतची माहिती प्रसिद्ध केली. त्यानंतर मात्र हे फूल पुन्हा सापडले नाही.
या फुलाबद्दल प्रचंड उत्सुकता असणारे दंतचिकित्सक व निसर्गतज्ञ तरुण छाब्रा यांनी निलगिरी पर्वतांमध्ये अनेक वर्षे कोब्रा लिलीचा शोध घेतला. 2009 मध्ये निलगिरी पर्वतांमध्ये असलेल्या शोला जंगलात एका छोट्या भागात त्यांना या फुलाचा शोध लागला. या फुलाला परत पाहू शकलो हे अत्यंत अविश्वसनीय आहे. हे फूल अतिशय सुंदर आहे, अशी प्रतिक्रिया छाब्रा यांनी व्यक्त केली. केरळमधील औषधी वनस्पती संशोधन केंद्रात या फुलाचे नमुने गोळा करण्यात आले. दुसऱ्या कोणत्याही अरिसामा जातीचे फूल अर्धपारदर्शक नसल्याने हे फूल अत्यंत दुर्मिळ आहे, असे औषधी वनस्पती संशोधन केंद्राचे के.एम. प्रभूकुमार यांनी सांगितले. शास्त्रज्ञ के.एम. प्रभूकुमार, इंदिरा बालचंद्रन व काही सहकाऱ्यांनी मिळून अरिसामा ट्रान्सलुसन्सचे दुसरे नमुनेही शोधले आहेत. वनस्पती आणि जैवविविधता या विषयाला समर्पित 'फिटोटास्का' या मासिकात निसर्गतज्ज्ञ तरुण छाब्रा यांनी या दोन्ही प्रकारांविषयी सविस्तर माहिती प्रसिद्ध केली. दोन्ही नमुने दक्षिण भारतात सापडतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
शोला जंगलात ज्या ठिकाणी या फुलांचे नमुने सापडले आहेत तिथे आजूबाजूला असलेल्या चहाच्या झाडांमुळे कोब्रा लिलीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आपल्याला एका ठिकाणी या फुलाचे नमुने सापडले. आजूबाजूच्या ठिकाणीसुद्धा या फूलाचे नमुने सापडण्याची शक्यता आहे, असे मत छाब्रा यांनी व्यक्त केले.
|
Tuesday, June 6, 2017
तब्बल 80 वर्षांनी सापडले कोब्रा लिलीचे फूल
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment