मुंबई : राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, ही कर्जमाफी ३४ हजार २२ कोटी रुपयांची असेल. हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने शनिवारी घेतला असून, त्यामुळे ४४ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
देशात आजवर कुठल्याही राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीपेक्षा ही रक्कम अधिक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या योजनेला छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना असे नाव देण्यात आले आहे.
या निर्णयामुळे दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेले ३६ लाख शेतकरी आणि त्यापेक्षा अधिकचे कर्ज असलेले ८ लाख अशा ४४ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. सरकारने ३० जून २०१६ पर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. याआधी सरकारने एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. चालू वर्षीचेही कर्ज माफ करण्याची मागणी मान्य करता येणार नाही. तसे कधीही झालेले नव्हते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
वरचे कर्ज फेडले तरच दीड लाखाची कर्जमाफी
दीड लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी आधी वरच्या कर्जाची परतफेड केली तरच त्यांना दीड लाखपर्यंत कर्जमाफी मिळेल. त्यामुळे या आठ लाख शेतकऱ्यांना आधी दीड लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या कर्जाची रक्कम बँकेत परतफेडीच्या स्वरूपात भरावी लागणार आहे. या निर्णयामुळे शेतकरी थकबाकीदार राहणार नाही, त्यांचा सातबारा कोरा होईल आणि त्यांना नव्याने कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

No comments:
Post a Comment