नवी दिल्ली : भारताने नाथु ला खिंडमार्गे कैलास मानसरोवरला जाणाऱ्या यात्रेकरूंची यात्रा थांबविली असून, सर्व यात्रेकरूंना दिल्लीला परत आणण्यात येत आहे. चीनच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे यात्रा समितीने सांगितले.
नाथु ला खिंडमार्गे कैलास मानसरोवरला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी चीनने दरवाजे उघडले नाहीत. त्यामुळे यात्रेकरूंना सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे नेण्यात आले. आता त्यांना दिल्लीला परत आणण्यात येत आहे. यात्रा अर्ध्यावर सोडावी लागल्यामुळे यात्रेकरूंत प्रचंड नाराजी पसरली आहे.
भाविकांना आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्यास मज्जाव करण्यात आल्यानंतर भारताने हा मुद्दा चीनकडे उपस्थित केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नाथु ला खिंडमार्गे होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. भाविक उत्तरांखडमार्गे यात्रा करू शकतात; परंतु हा मार्ग दुर्गम आहे, असे सूत्रांनी सांगितले. चीनने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्यास मज्जाव केल्यामुळे ४७ यात्रेकरूंचा पहिला जथ्था २० जूनपासून भारतीय सीमेवर अडकून पडला होता. हा जथ्था शुक्रवारी सायंकाळी गंगटोक येथे परतला. आम्हाला नाथु लापासून सात कि.मी.वरील शेरतांग येथे एका छावणीत ठेवण्यात आले होते, असे या भाविकांनी सांगितले. दरवर्षी देशभरातून शेकडो यात्रेकरू कैलास मानसरोवर यात्रा करतात. याच महिन्याच्या प्रारंभी शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेदरम्यान चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा करून परस्पर सहकार्य वाढविण्यावर जोर दिला होता. तथापि, चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर आणि एनएसजीतील भारताच्या सदस्यत्वावरून दोन्ही देशांत मतभेद निर्माण झाले असताना चीनचा हा पवित्रा समोर आला आहे

No comments:
Post a Comment