Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Wednesday, June 7, 2017

जीएसटी कर लागू केल्यास मराठी चित्रपटसृष्टी धोक्यात, चित्रपट महामंडळ करणार आंदोलन



सोलापूर - मराठी चित्रपट जगावा म्हणून केलेल्या करमुक्त (टॅक्स फ्री) च्या नियमाला आता केंद्र सरकारच्या वस्तू सेवा करामुळे (जीएसटी) चित्रपट तिकीट दरावर रसिकांना तब्बल २८ टक्के कर भरावा लागणार आहे. नव्या धोरणानुसार लावल्या जाणाऱ्या या करामुळे मराठी चित्रपट पाहणारे रसिक मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.
या कराचा परिणाम तिकिटावर म्हणजेच थेट प्रेक्षकांवर होणार आहे. या महागाईमुळे पुन्हा मराठी चित्रपट पूर्वीच्या बिकट अवस्थेत जाऊ शकतो. मराठी चित्रपट वगळता हिंदी, इंग्रजीसह अन्य भाषक चित्रपटांना सोलापुरात राज्यात प्रत्येकी एका तिकिटास ४० टक्के कर भरावा लागतो. मात्र जीएसटी प्रणालीमुळे मराठीसह सर्वच प्रादेशिक चित्रपटांना हिंदी, इंग्रजी चित्रपटांशी स्पर्धा करत कर द्यावा लागण्याची शक्यता आहे.
राज्यभरातील चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा इशारा
याकराच्या विरोधात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ मोठ्या शक्तीने उभे राहणार आहे. त्यात जुलैपर्यंत हा कर माफ करण्याची वाट पाहिली जाणार आहे. मात्र जर कर माफ केला नाही तर त्या विरोधात राज्यभर चित्रपटगृहे बंद करून प्रदर्शन थांबवणार आहे. शिवाय संपूर्ण राज्यातील सर्व कलावंत मिळून आझाद मैदानावर साखळी उपोषणाला बसणार आहेत.
सोलापुरात मोठा तोटा
तेलुगूआणि मराठी असे दोन प्रादेशिक भाषेतील चित्रपट या वेळी या कराच्या कचाट्यात अडकणार आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही चित्रपटांना पाहण्यासाठी या दोन ते तीन वर्षांत मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे या कराचा चांगला फटका रसिकांना बसणार आहे.
निर्मितीचा खर्च वाढणार
जीएसटीकरामुळे मराठी चित्रपटसृष्टीला धोका आहे. इतर भाषक चित्रपटांच्या स्पर्धेत निर्मितीचा खर्च वाढणार. परिणामी पुन्हा संकट येणार. शिवाय याचा ताण रसिकांवर येणार आहे. हा प्रश्न गांभीर्याने सोडवल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. जुलैच्या आत तोडगा निघाला नाही तर संपावर जाऊ.
- मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
सबसीडी देऊन कर लावणे चुकीचे
मराठी चित्रपट सक्षम नाहीत. ते स्पर्धेत तग धरत नाहीत, म्हणून जर सबसीडीची, सवलतीची मदत शासन करत असेल तर त्यांनी कर घेण्याचा विचारच करू नये. कारण आधीच मराठी चित्रपटसृष्टी ही अनेक परीक्षांतून बाहेर पडते. त्यात पुन्हा हा कराचा बोजा अवघड होणार आहे.
- अदित्य सरपोतदार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक

No comments:

Post a Comment