Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Monday, June 26, 2017

‘एटीएम’ची पन्नाशी


आज २७ जून हा दिवस जागतिक पातळीवर लक्षणीय दिवस आहे. तुम्हा-आम्हा सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या ‘आॅटोमॅटिक टेल्लर मशिन’च्या (एटीएम) वयाला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. बार्कलेज बँकेने उत्तर लंडनमधील एन्फिल्ड टाऊनमधील त्यांच्या शाखेत २७ जून १९६७ रोजी पहिले ‘एटीएम’ मशिन बसविले. त्यावेळी कार्ड नव्हते. बँकेच्या कॅशियरने लिहून दिलेली चिठ्ठी वाचून हे मशिन पैसे देत असे. आज जगभरात ३० लाखांहून अधिक एटीएम कार्यरत आहेत. उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत आणि लक्झरी क्रुझ बोटीपासून युद्धनौकेपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र ही यंत्रे पाहायला मिळतात. सरासरी ३००० लोकांमागे एक अशी याची जागतिक सरासरी आहे. ‘एटीएम’ यंत्रामागची संकल्पना कायम राहिली असली तरी त्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत गेले. त्यामुळे रोख रक्कम उपलब्ध होण्यासाठी असलेले वेळेचे बंधन झुगारून देण्यासाठी सुरू झालेल्या या यंत्राला आता भौगोलिक सीमाही राहिलेल्या नाहीत. एका देशातील नागरिक दुसऱ्या देशात जाऊनही ‘एटीएम’वर पैसे काढू शकतो. तसेच सर्व बँकांची एटीएम परस्परांना जोडलेली असल्याने कोणत्याही बँकेचा खातेदार त्याच्या व इतरही बँकांच्या एटीएमवरून पैसे काढू शकतो. सुरुवातीस फक्त पैसे काढण्यासाठी सुरू केलेले हे मशिन आता बहुढंगी सेवा देणारी बँकेची छोटीशी शाखाच झाली आहेत. मजेची गोष्ट अशी की लोकांना हवे तेव्हा व हवे तेथे रोख पैसे उपलब्ध करून देणाऱ्या या यंत्रांचा प्रसार-प्रचार होत असनाच नेमकी याला छेद देणारी गोष्टही घडत गेली. ती म्हणजे रोख पैशाविना व्यवहार करण्याचे तंत्रज्ञान. सुरक्षा, सोय आणि स्वच्छ, तत्पर व्यवहार यादृष्टीने रोख पैशांचा वापर न करणे श्रेयस्कर असले तरी माणसाची रोख पैशाशी जुळलेली नाळ अजूनही घट्ट आहे व ती सहजी तुटेल असे वाटत नाही. त्यामुळे डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या मायाजालात एटीएम टिकून राहतील का? ही शंकाच मुळी फिजूल आहे. जोपर्यंत माणूस आहे व जोपर्यंत पैसे मोजून व्यवहार करावे लागणार आहेत तोपर्यंत आपल्या नाक्यावरचे एटीएमही एक गरज म्हणून कायम राहणार आहे.

No comments:

Post a Comment