Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Monday, June 26, 2017

समता रॅलीतून उलगडला राजर्षींचा जीवनपट


कोल्हापूर : ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय...’ असा अखंड जयघोष... आकर्षक चित्ररथांतून उलगडलेला राजर्षी शाहूंचा जीवनपट... प्रबोधनपर फलक... झांजपथकांचा दणदणाट.... लेझीम पथकांचा कलाविष्कार... असे उत्साही वातावरण सोमवारी सकाळी पाहावयास मिळाले. निमित्त होते, राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित समता रॅलीचे. यावेळी शाहूंच्या जयजयकाराने दसरा चौक दुमदुमला.
सकाळी साडेआठच्या सुमारास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शाहू छत्रपती, महापौर हसिना फरास, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार सतेज पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, आदी प्रमुख उपस्थित होते.
यानंतर समता रॅलीला सुरुवात झाली. यामध्ये शाहू महाराजांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राजर्षी शाहूंचा जीवनपट शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्ररथातून उलगडण्यात आला. विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाच्या कलाविष्काराने अंगावर रोमांच उभे राहत होते. ही रॅली व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी चौक, महापालिका, सीपीआर मार्गे दसरा चौक येथे येऊन रॅलीचा समारोप झाला.स्थायी समितीचे सभापती डॉ. संदीप नेजदार, माजी महापौर आर. के. पोवार, नगरसेवक अशोक जाधव, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, माजी नगरसेवक राजू लाटकर, शाहीर दिलीप सावंत, कादर मलबारी, राजदीप सुर्वे, महादेव पाटील, आर. डी. पाटील यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, आदि मान्यवर या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
‘विद्यापीठ’चे लक्षवेधी प्रबोधनपर फलक
या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यापीठ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या हातातील ‘जाणता राजा शाहू’, ‘समतावादी लोकराजा राजर्षी शाहू’, ‘राजर्षी शाहूंचा उपक्रम, प्राथमिक शिक्षणाला अग्रक्रम’ असे प्रबोधनपर फलक सर्वांचे लक्ष वेधत होते.
‘महाराष्ट्र’च्या लेझीम पथकाचा आविष्कार
समता रॅलीमध्ये महाराष्ट्र हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने उत्कृष्ट कलाविष्कार सादर करीत उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले.

No comments:

Post a Comment