Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Friday, July 21, 2017

भारत-चीनच्या वादात पाकिस्तान खुपसतोय नाक


नवी दिल्ली, दि. 21 - नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणारा पाकिस्तान आता भूतान-चीन आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या डोकलाममधल्या वादात उडी घेण्याच्या प्रयत्नात आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर भारतात असलेले पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी चीनचे उच्चायुक्त लू झाओहुई यांची भेट घेतली आहे. इतकंच नव्हे तर बासित लवकरच भूतानचे उच्चायुक्त वेटसॉप नमगेल यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, बासित यांनी चिनी उच्चायुक्ताशी बुधवारी चर्चा केली. आता ते लवकरच भूतानच्या उच्चायुक्तांचीही भेट घेणार आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बासित दोन्ही देशांच्या उच्चायुक्तांशी डोकलाम वादावर चर्चा करू इच्छितात. बासित यांनी भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त म्हणून कार्यकाळ पूर्ण केला आहे. पुढच्याच महिन्यात ते पुन्हा पाकिस्तानात जाण्याची शक्यता आहे.
सिक्कीम सेक्टरमधील डोकलाम परिसरावरून जवळपास 10 हजार फूट उंचीवर भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. भारतीय सैन्याने मागे हटावे, यासाठी चीनकडून वारंवार इशारे देण्यात आले आहेत. मात्र तरीही भारतीय लष्कराचे जवान सिक्कीम सेक्टरमध्ये पाय रोवून उभे आहेत. भारतीय लष्कराच्या जवानांनी जवळपास 10 हजार फूट उंच या वादग्रस्त भागात तंबू गाडले आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान तेथून सरकणार नाही, तोपर्यंत आपणही माघार घेणार नाही, असा पवित्रा या सैनिकांनी घेतला आहे. दरम्यान, भारतीय जवानांनी या परिसरात तंबू ठोकल्यानंतर आता चीननेही येथे दीर्घकाळ उभे राहण्याच्या इराद्याने तळ ठोकला.
सिक्कीमजवळील डोकलाम परिसरात भारत आणि चिनी सैन्यामध्ये निर्माण झालेला तिढा आता अधिकच वाढला आहे. चीनच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जवानांनी या परिसरात तंबू ठोकल्यानंतर आता चीननेही येथे दीर्घकाळ उभे राहण्याच्या इराद्याने तळ ठोकला आहे. या ठिकाणी दोन्हीकडचे सुमारे प्रत्येकी 300 सैनिक उपस्थित असून, दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये केवळ 120 मीटरचे अंतर आहे. असे असले तरी दोन्ही सैन्यांमध्ये झटापट होण्याची शक्यता नाही.

No comments:

Post a Comment