चेन्नई, दि. 22- अंतराळ क्षेत्रातील कामगिरीमध्ये भारतासाठी हे वर्ष खूप यशस्वी असल्याचं बोललं जातं आहे. भारताच्या या यशस्वी पर्वात आणखी एक नाव जोडलं आहे. बंगळुरूतील 'इंडस' ही संस्था लवकरच अवकाश क्षेत्रात मोलाची कामगिरी करायला सज्ज झाली आहे. या वर्षअखेरपर्यंत चंद्रावर जगातील पहिलं खासगी स्पेसक्राफ्ट पाठविण्याच्या तयारीत इंडस ही संस्था आहे. आपल्या ध्येयापासून इंडसची टीम फक्त एक पाऊल लांब आहे. या टीमचं खासगी स्पेसक्राफ्टचं संपूर्ण काम पूर्ण झाल्यावर हे क्राफ्ट एका पीएसएलव्हीद्वारे श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपित केलं जाणार आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
आम्ही एक कॉलिफिकेशन मॉडेल तयार केलं असून ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्याची कठोर तपासणी केली जाइल. या तपासणीनंतर एक फ्लाइट मॉडेल तयार केलं जाइल, असं इंडसच्या मार्केटिंग इनचार्ज शीलिका रविशंकर यांनी सांगितलं आहे. चंद्रावर पहिलं प्रायव्हेट स्पेसक्राफ्ट पाठविण्याबद्दलची माहिती इंडसचे संस्थापक राहुल नारायण यांनी चेन्नई इंटरनॅशनल सेंटरच्या 'मिशन टू द मून: फ्यूल्ड बाय अॅम्बिशन' या सत्रा दरम्यान दिली आहे. राहुल नारायण दिल्ली आयआयटीचे विद्यार्थी होते.
राहुल नारायण यांची इंडस ही कंपनी गुगलच्या लूनर X प्राइज कॉम्पिटिशनच्या अंतिम स्पर्धेत पोहचलेल्या पाच कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. 600 किलो इतक वजन असलेलं हे स्पेसक्राफ्ट इस्रोच्या चोवीस निवृत्त शास्त्रज्ञांच्या मदतीने तयार झालं आहे. तसंच जवळपास 100 जणांची टीम या मिशनसाठी काम करते आहे. 600 किलो वजनाचं हे स्पेसक्राफ्ट 6 किलो वजन असलेलं 'एक छोटीसी आशा' हे रोवर घेऊन जाणार आहे. तसंच एका जपानी टीमने तयार केलेला रोवरही घेऊन जाणार आहे. तसंच इंडसचं खासगी स्पेसक्राफ्ट फ्रेंच स्पेस एजन्सीचा कॅमेराही घेऊन जाणार आहे.
स्पेसक्राफ्टने टेकऑफ केल्यानंतर जवळपास 15 मिनीटांनंतर स्पेसक्राफ्ट लॉन्च वेइकलपासून वेगळं होइल. त्यानंतर पृथ्वीभोवती दोन फेऱ्या मारून ते वरच्या दिशेने जाइल. यानंतर चंद्राच्या दिशेने उड्डाण वाढेल. तब्बल 3.8 लाख किमीचा प्रवास करून पाच दिवसांनी स्पेसक्राफ्ट चंद्राच्या कक्षेत पोहचेल. तेथे चार दिवस राहिल्यानंतर क्राफ्ट चंद्रावर उतरेल. खरंतर लँडिंग सगळ्यात कठीण असल्याचं, राहुल नारायण यांनी सांगितलं आहे.

No comments:
Post a Comment