Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Monday, July 17, 2017

कथित गोरक्षकांवर कारवाई करा; नरेंद्र मोदींचे राज्यांना निर्देश, गोरक्षेच्या नावाने हिंसाचार मान्य नाही


नवी दिल्ली-गोरक्षेच्या नावाखाली हिंसाचार आणि अशा घटनांना जातीय रंग देऊन राजकारण करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सक्त ताकीद दिली. ते म्हणाले, गोरक्षेच्या नावावर होत असलेला हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही. राज्य सरकारांनी अशा कथित गाेरक्षकांवर कठोर कारवाई करावी.

सोमवारपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला बोलावलेल्या बैठकीत मोदी म्हणाले, गोरक्षेसाठी कायदा अस्तित्वात आहे. त्याला तोडण्याचा कोणताही पर्याय नाही. गोरक्षेच्या नावावर होत असलेल्या झुंडशाहीविरुद्ध सर्व पक्षांनी एकजूट व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. ते म्हणाले, राजकीय फायद्यासाठी अशा घटनांना जातील रंग देऊन देशाचे हित साधता येणार नाही. अशा घटना देशाची प्रतिमा मलिन करतात.

गोरक्षेच्या नावावर देशात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. विरोधी पक्षांनी हा मुद्दा संसदेत मांडण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांनी बैठकीत उपस्थित सर्व पक्षांना पावसाळी अधिवेशन योग्य रीतीने चालवण्याची विनंती केली. विरोधी पक्षांनीही राष्ट्रीय एकात्मता व अखंडतेच्या मुद्द्यावर सरकारला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

लालूंवर निशाणा : भ्रष्ट नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नका
मोदी म्हणाले, भ्रष्ट राजकारण्यांपासून दूर राहा आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नका. भ्रष्टाचारामुळे जनसेवेतील लोकांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याविरुद्ध सर्व नेत्यांनी एकत्र आले पाहिजे. भ्रष्ट नेत्यांवरील कारवाईला राजकीय षड््यंत्र संबोधण्याऐवजी त्यांच्याविरुद्धच्या तपासात मदत करावी.

काँग्रेसची भूमिका : केंद्र सरकार बंदुकीच्या जोरावर काश्मीर प्रश्न सोडवणार असेल तर आमची साथ नाही
संसदेत काँग्रेस १८ विरोधी पक्षांसोबत एकजूट दाखवेल. सिक्कीममध्ये चीनसोबत वाद व काश्मिरातील तणावासारखे मुद्दे उपस्थित केले जातील. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले, काश्मिरातील तणाव दूर करण्यासाठी बंदूक हाच एकमेव मार्ग असल्याचे सरकारला वाटत असेल तर आम्ही त्यांच्यासोबत नाहीत. चीनसोबतच्या वादावरही चर्चा व्हावी.

या मुद्द्यांवर घेरणार
सीमेवर चीनसोबत तणाव, काश्मिरातील परिस्थिती, शेतकरी आत्महत्या, गोमांसावरून हिंसक घटना, जीएसटीमुळे वस्त्रोद्योग व कर्मचाऱ्यांवरील परिणाम, आसाममधील महापूर आदी.

शेण व गोमूत्रावर संशोधनासाठी केंद्रीय समिती स्थापन, संघ व विहिंपचे सदस्य
केंद्र सरकारने गोमूत्रासह गाे उत्पादने आणि त्यांच्या फायद्यावर वैज्ञानिक संशोधने व अधिकृत करण्यासाठी १९ सदस्यीय राष्ट्रीय संचालन समिती स्थापन केली आहे. त्यात राष्ट्रीय स्वसंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या तीन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती पोषण, आरोग्य आणि कृषीसारख्य विविध क्षेत्रांत पंचगव्यांचे फायद्यांवर वैज्ञानिकरीत्या शिक्कामोर्तब करण्यास मदत करणार आहे.

समितीत विजय भटकर, रघुनाथ माशेलकर
या समितीत अक्षय्य ऊर्जा मंत्रालय, जैवतंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांचे सचिव तसेच दिल्ली आयआयटीच्या वैज्ञानिकांचा समावेश आहे. समितीचे सहअध्यक्ष शास्त्रज्ञ विजय भटकर यांच्यासह सदस्य म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, दिल्ली आयआयटीचे संचालक प्रो. व्ही. रामगोपाल राव, व्ही.के. विजय, आरएसएसचे जयकुमार, नागपूरच्या गोविज्ञान संशोधन केंद्राच्या सुनील मनसिंहका यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment