Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Sunday, July 2, 2017

शुक्रावर करणार सजीवसृष्टीचे ‘बीजारोपण’!


मुंबई : भविष्यात गरज पडली तर मानवाला ‘सेकंड होम’ म्हणून शुक्र ग्रहावर जाऊन राहणे शक्य व्हावे या कल्पनेने पृथ्वीवरील जीवाणू शुक्राच्या वातावरणात नेऊन सोडून ते कालांतराने मानवी वस्तीसाठी अनुकूल करण्याची सुरुवात आतापासून सुरू करण्याची एक अभिनव आणि धाडसी योजना मुंबईतील एका स्वयंसेवी संस्थेने आखली आहे.
नफा कमावणे हा उद्देश नसलेल्या ‘इंडियन अ‍ॅस्ट्रोबायोलॉजी रीसर्च फाउंडेशन’ (आयएआरएफ) या स्वयंसेवी संस्थेने सूरत येथे भरलेल्या जागतिक खगोल जीवशास्त्र परिषदेत या योजनेची रूपरेषा शनिवारी औपचारिकपणे जाहीर केली. संस्थेने त्यांच्या या प्रस्तावित योजनेला ‘बीजायन मिशन’ असे नाव दिले आहे. ‘बीजायन’ हा ‘बीज’ आणि ‘आयन’ या दोन संस्कृत शब्दांचा संयोग असून त्याचा अर्थ ‘बीजाचा अज्ञातातील प्रवास’ असा होतो.
या मिशनचे मुख्य वैज्ञानिक व ‘आयएआरएफ’चे संचालक पुष्कर गणेश वैद्य यांनी सूरत येथील परिषदेत व नंतर ‘लोकमत’ने ई-मेलने पाठविलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन या मिशनविषयी सविस्तर माहिती दिली. शुक्र हा आपल्या ग्रहमालेतील सूर्यापासूनचा दुसरा ग्रह असून रात्रीच्या व पहाटेच्या आकाशात तो तेजस्वीपण दिसतो म्हणून त्याला बोली भाषेत ‘शुक्रतारा’ असे म्हटले जाते. कक्षेतील प्रदक्षिणेनुसार शुक्र पृथ्वीपासून जवळात जवळ ३.८० कोटी किमी तर दूरात दूर २६.१ कोटी किमी अंतरावर आहे. ग्रहमालेतील इतर ग्रहांहून उलट्या दिशेने म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे असा तो स्वत:भोवती फिरत असतो.
अशा या ग्रहावर एक छोटेखानी यान पाठवून शुक्र पृथ्वीसारखा करण्यासाठी ‘टेराफॉर्मिंग’ करण्याची प्रक्रिया सुरु करणे ही आमच्या ‘बिजायन’ मिशनमागची मुख्य कल्पना आहे, असे वैद्य यांनी सांगितले.
अधिक स्पष्टिकरण देताना वैद्य म्हणाले की, ‘टेराफॉर्मिंग’ म्हणजे एखाद्या ग्रहाच्या वातावरणात ठराविक अतिसुक्ष्मजीव मुद्दाम नेऊन सोडून ते वातावरण मानवी वस्तीसाठी अनुकूल बनविण्याची प्रक्रिया सुरु करणे. त्यानुसार ‘बिजायन’ मिशनमध्ये ज्यांच्यामुळे मानवाला कोणत्याही रोगराईची लागण होत नाही अशाव अत्यंत प्रतिकूल वातावरणातही जिवंत राहून फोफावू शकणाऱ्याअशा अतिसुक्ष्म जिवाणूंना पृथ्वीवरून नेऊन शुक्राच्या वातावरणात मुद्दाम सोडले जाईल.
अशा अतिसूक्ष्म जिवाणूंना वैज्ञानिक परिभाषेत ‘नॉन पॅथोजेनिक एक्स्ट्रिमोफिर मायक्रोआॅग्रॅनिझम्स’ असे म्हटले जाते.
अशा प्रकारे पृथ्वीवरून नेऊन सोडलेले सुक्ष्मजिवाणू शुक्राच्या वातावरणात जिवंत राहून फोफावू शकण्याची शक्यता कितपत
आहे, असे विचारता ६० ते ७०टक्के असे उत्तर देऊन वैद्य म्हणाले की, अशा प्रकारचे सुक्ष्मजिवाणू पृथ्वीवर आणि अंतराळातही
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत टिकाव धरू शकतात, हे सप्रमाण सिद्ध झाले आहे.
                       पुष्कर गणेश वैद्य, वैज्ञानिक 
सुक्ष्मजिवाणूंची जनुकीय ओळख
आता शुक्राच्या वातावरणात सोडल्या जाणाऱ्या सुक्ष्मजिवाणूंचे नेमके काय झाले, याचा भविष्यात धांडोळा घेताना हे सुक्ष्मजिवाणू पृथ्वीवरून पाठविलेलेच आहेत हे नेमके ओळखता यावे यासाठी प्रत्यक्ष मिशनपूर्वी या सुक्ष्मजिवाणूंची नेमकी जनुकीय वर्गवारी करून त्यांची पक्की ओळख निश्चित केली जाईल.
या मिशनसाठी ‘थर्मोफिल’ व ‘अ‍ॅसिडोफिल’ या वर्गात मोडणारे सुक्ष्मजिवाणू वापरले जाऊ शकतात. ‘थर्मोफिल’ जिवाणू १०० अंशाहून जास्त तापमानातही सुखेनैव राहू शकतात व ‘अ‍ॅसिडोफिल’ वर्गातील ‘फेरोप्लाझमा अ‍ॅसिडीफिलम’ सल्फ्युरिक आम्लातच राहणे पसंत करतात. ‘टार्डिग्रेड््स’ प्रवर्गातील सुक्ष्मजिवाणू उणे २०० अंश ते ३०० अंश सेल्सियस अशा अतिटोकाच्या तापमानात, उकळत्या द्रवात, समुद्राच्या तळाशी असते त्याच्या सहापट दबावाखाली आणि अंतराळासारख्या निर्वात पोकळीतही जिवंत राहू शकतात, असे वैज्ञानिक प्रयोगांवरून सिद्ध झाले आहे.
४६० अंश सेल्सिअस तापमान, ९५% कार्बन डायआॅक्साइड
प्रेमीजिवांचा लाडका शुक्र प्रत्यक्षात सजीवसृष्टीसाठी अत्यंत प्रतिकूल आहे. शुक्राच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे ४६० अंश सेल्सिअस आहे.
त्याच्या वातावरणाची घनता पृथ्वीच्या वातावरणाहून शतपटीने अधिक आहे, वातावरणात ९५ टक्के कार्बन डायआॅक्साइड आहे व तेथे सल्फ्युरिक आम्लाचा पाऊस पडत असतो!
शुक्रावर भूतकाळात  सजीव नांदून गेल्याची, सध्या असण्याची किंवा भविष्यात उत्क्रांत होण्याची शक्यता नाही, यावर वैज्ञानिकांचे एकमत आहे.
सूक्ष्म जीवाणूंच्या माध्यमातून एखाद्या ग्रहाच्या वातावरणात बदल घडवून आणण्याची कल्पना वैज्ञानिकांमध्ये फार वर्षांपासून चर्चेत आहे. परंतु प्रत्यक्ष अंतराळ मिशन पाठवून ही कल्पना कोणीही प्रत्यक्षात उतरविली नव्हती. ‘बीजायन’ने नेमके तेच करण्याची आमची योजना आहे.
प्रश्न-तुमच्या प्रस्तावित यानाला शुक्रापर्यंत पोहोचायला किती काळ लागेल?
वैद्य- साधारणपणे १५० दिवस. नक्की वेळ कोणती कक्षा निवडू त्यावर ठरेल.

प्रश्न- शुक्राच्या वातावरणात हे सुक्ष्मजिवाणू किती अंतरावरून फवारले जातील?
वैद्य- शुक्राच्या ‘हिल स्पियर’मध्ये पाच ते १० लाख किमी अंतरावरून.

प्रश्न- यासाठी लागणारे विशिष्ठ प्रकारचे सुक्ष्मजिवाणू कुठून आणणार? ते सहज उपलब्ध आहेत की प्रयोगशाळेत 
मुद्दाम
तयार करावे लागतील ?
वैद्य- हे जिवाणू मानवाला रोगराईची लागण न करणारे असल्याने ते प्रयोगशाळांमधून विकत घेण्यात काही अडचण नाही. शिवाय निसर्गातूनही ते सहजपणे उपलब्ध होऊ शकतात.

No comments:

Post a Comment