या महिन्यापासून घरगुती गॅसच्या दरात जीएसटीमुळे वाढ होणार आहे. एकीकडे करण्यात आलेली अनुदान कपात आणि दुसरीकडे जीएसटीमुळे लागलेला कर अशा दोन्ही गोष्टींमुळे ग्राहकांना प्रत्येक सिलींडरमागे तब्बल ३२ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
याव्यतिरिक्त दोन वर्षांचं गॅस तपासणी शुल्क (जे बंधनकारक असतं), नवं कनेक्शन, अतिरिक्त सिलींडर्स या सर्व बाबींवर जीएसटीअंतर्गत १८ टक्के कर लावण्यात आला आहे. त्यामुळे या सेवांचे भावही वाढतील. एलपीजीवर ५ टक्के कर आकारण्यात येणार आहे. आतापर्यंत दिल्लीसारख्या काही महानगरांमध्ये एलपीजीवर कर नव्हता, केवळ २ आणि ४ टक्के व्हॅट लावला जाई. परिणामी ज्या राज्यांत एलपीजीवर कर नव्हता तेथे जीएसटीमुळे एलपीजी सिलींडरचा दर १२ ते १५ रुपयांनी वाढणार आहे. अन्य राज्यांमध्ये जीएसटी आणि व्हॅट यांच्यातल्या तफावतीवर गॅसची किंमत ठरेल.
जूनपासून अनुदानाच्या किंमतीत सरकारने कपात केली असल्याने आधीच ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे, त्यात जीएसटीमुळे भर पडणार आहे. ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव विपुल पुरोहित यांनी सांगितले, 'समजा आग्र्यातील गॅस ग्राहकांना जूनपूर्वी ११९.८५ रुपये अनुदान मिळत होते. त्यात कपात केल्यामुळे आता १०७ रुपयेच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार.'

No comments:
Post a Comment