पाटणा, दि. 30 - बिहार विधानसभेच्या आवारात 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्यामुळे नितीशकुमार यांच्या मंत्रीमंडळातील खुर्शीद ऊर्फ फिरोज अहमद यांच्या विरोधात एका संघटनेनं फतवा जारी केला आहे. इमारत-ए-शरिया नावाच्या संघटनेनं हा फतवा काढला आहे. या फतव्यात त्यांनी संयुक्त जनता दलाचे आमदार व बिहारचे अल्पसंख्याक मंत्री फिरोज अहमद यांना इस्लाम धर्मातून बहिष्कृत करण्यात आलेलं आहे. इमारत-ए-शरिया या संघटनेचे मुफ्ती सुहैल अहमद कासमी यांनी हा फतवा जारी केला आहे. यामध्ये त्यांनी फिरोज अहमद यांना विश्वास न ठेवणारा तसेच मुस्लीम धर्मातून बहिष्कृत केलं आहे.
फतवा जारी झाल्यानंतर फिरोज म्हणाले की, बिहारच्या लोकांसाठी मी जय श्रीरामच्या घोषणा दिला होत्या. या घोषणेमुळे जर बिहारच्या जनतेचा विकास होत असेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. माझ्याविरोधात फतवा काढण्यापूर्वी त्यांनी माझा उद्देश लक्षात घ्यायला हवा होता. जय श्रीराम बोलण्यामागे माझा हेतू स्वच्छ होता. इमारत-ए-शरियाबद्दल मला प्रचंड आदर आहे. मात्र अशा फतव्यांना मी घाबरत नाही.
खुर्शीद यांनी अलीकडेच विधानसभेच्या आवारात 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या होत्या. 'जय श्रीराम' म्हटल्यानं बिहारच्या १० कोटी जनतेचा फायदा होणार असेल तर मी सकाळ-संध्याकाळ जय श्रीराम म्हणायला तयार आहे. इस्लाममध्ये द्वेषाला थारा नाही. प्रेम हाच इस्लामचा पाया आहे. रहीमसोबत मी रामालाही पूजतो, असं त्यांनी म्हटलं होतं.बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या कॅबिनेटचा विस्तार केला आहे. काही खाती नव्या मंत्र्यांना देताना विभागणीही करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्याकडे अर्थ खात्याचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनेक मंत्र्यांना त्यांचं आधीचंच खातं देण्यात आलं आहे, तर काही मंत्र्यांची खाती बदलण्यात आली आहेत. शनिवारी संध्याकाळी पाटणा येथील राजभवनात राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठींनी २६ नवनियुक्त मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. खुर्शीद आलम यांच्याकडे अल्पसंख्यक कल्याण आणि उस उद्योग मंत्रालय देण्यात आले आहे.
बुधवारी संध्याकाळी नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत बिहारच्या राजकीय वर्तुळात भूकंप आणला होता. संपूर्ण देशबांधवांसाठी हा अनपेक्षित धक्काच होता. पण त्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच मोदींनी नितीशकुमाराच्या या निर्णयाचं कौतुक करत जे काही ट्विट केलं होतं ते पाहून हळूहळू बिहारच्या राजकारणातलं बदललेलं चित्र स्पष्ट होऊ लागलं. त्यानंतर भाजपाच्या साथीनं त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

No comments:
Post a Comment