मुंबई, दि. 18 - लग्न म्हटले की, कुटुंबिय, नातेवाईक आणि मित्रपरिवार यांचा उत्साह ओसांडून वाहत असतो. लग्नाच्या दिवशी तर, या सर्वांचा उत्साह टिपेला पोहोचलेला असता. हा दिवस सगळयांच्याच लक्षात राहील अशा पद्धतीने साजरा करण्याच्या नादात अनेकदा लग्नाच्या हॉलबाहेर फटाके फोडले जातात. डिजे तालावर ठेका धरला जातो. पण यापुढे व-हाडी मंडळींना हॉलवर अशा प्रकारे सेलिब्रेशन करता येणार नाही.
कारण राष्ट्रीय हरीत लवादाने लग्नाचे हॉल आणि लॉन्सवर डीजे आणि फटाके फोडून ध्वनिप्रदूषण करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. पुण्यातील सुजल सहकारी गृहरचना संस्था सोसायटीने दाखल केलेल्या याचिकेवर राष्ट्रीय हरीत लवादाने हा निर्णय दिला. एनजीटीचे न्यायाधीश यू.डी.साळवी आणि डॉ. अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.
पुण्यातील म्हात्रे पूल आणि राजाराम पूलाच्या परिसरात लग्नाचे चार हॉल आणि लॉन्स असून तिथे लग्न सोहळयाच्यावेळी फटाके फोडून, डिजे वाजवून ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याची तक्रार सुजल सहकारी संस्थेने केली होती. एनजीटीचा हा आदेश आता राज्यातील लग्नाचे सर्व हॉल्स आणि लॉन्सना लागू होणार आहे.
लग्नाच्या हॉलवर लाऊडस्पीकर लावण्यासाठी आता आवश्यक परवानगी घ्यावी लागेल. बेकायदा डीजे किंवा वाद्य वाजविल्यास 50 हजार रुपयापर्यंत दंड ठोठावला जाईल तसेच लग्नाच्या हॉलच्या आसपासच्या परिसरात कुठेही कचरा फेकलेला आढळल्यास 50 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. लग्नाच्या हॉल्सना एमपीसीबीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे. वरील नियम व अटींचे उल्लंघन झाल्यास हॉल मालकाविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
No comments:
Post a Comment