आषाढ महिन्यात मटण, मासळी आणि चिकनला मोठी मागणी असते, कारण सामिष खवय्ये श्रावण महिन्यात सामिष पदार्थ वज्र्य करतात. आषाढ महिन्याचा शेवटच्या आठवडय़ात मटण, मासळी, चिकनच्या मागणीत वाढ झाली असून, खरेदीसाठी मासळी बाजारात खवय्यांची मोठी गर्दी झाल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे आणखी आठवडाभर सामिष खवय्यांची चंगळ आहे.
आषाढ महिन्यात मटण, मासळी आणि चिकनच्या मागणीत दुपटीने वाढ होते. श्रावण महिना व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्रौत्सव येतो. अनेक जण दसऱ्यानंतर सामिष पदार्थ खातात, त्यामुळे आषाढ महिन्यात खवय्यांकडून मोठी मागणी असते, असे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले आहे. या संदर्भात रूपेश अॅग्रोचे रूपेश परदेशी म्हणाले, चिकनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. एरवीच्या तुलनेत जवळपास पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. आषाढ महिन्याची सांगता रविवारी (२३ जुलै) होणार आहे. शेवटच्या रविवारी चिकनच्या मागणीत दीडपट वाढ होईल. सध्या हॉटेल व्यावसायिक तसेच किरकोळ ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. चिकनचे दर स्थिर आहेत. प्रतिकिलो १६० रुपये किलो दराने चिकनची विक्री केली जात आहे.
पुणे जिल्हय़ातील सासवड, जेजुरी, भोर, खडकवासला भागांतील अनेक शेतक ऱ्यांकडून कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला जातो. पुणे जिल्हय़ातील कुक्कुटपालन व्यावसायिक आणि चिकन विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून शहरातील किरकोळ व्यावसायिकांना पक्षी विक्रीसाठी पाठवले जातात, असे त्यांनी सांगितले
गणेश पेठेतील मासळी बाजारात मासळीची आवक वाढली असून, आठवडाभर मासळीला मोठी मागणी राहील. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (१६ जुलै) खोल समुद्रातील मासळी दहा ते बारा टन, खाडीची मासळी दोनशे ते तीनशे किलो, नदीची मासळी पाचशे ते सहाशे किलो, आंध्र प्रदेशातून रहू, कतला आणि सिलनची चौदा टन आवक झाली, अशी माहिती मासळी बाजारातील प्रमुख विक्रेते ठाकूर परदेशी यांनी दिली. पापलेट, सुरमई, वाम या मासळींचे भाव वाढले आहेत. करली, करंदी, भिंग, कोळंबी, तांबोशी आणि बांगडय़ाच्या भावात अल्पशी घट झाली आहे. येत्या रविवारी (२३ जुलै) मासळी बाजारात मोठी आवक होईल. हॉटेल व्यावसायिक आणि किरकोळ ग्राहकांकडून मासळीला चांगली मागणी आहे, असे परदेशी यांनी सांगितले.
मासळीचे दर (किलोमध्ये)
पापलेट- ७०० ते १६०० ,
भिला- ६००, हलवा- ६५०,
रावस- ६५० ते ७५०,
घोळ- ५५०, करली- ३२०,
करंदी- ३२०, भिंग- ३६०,
पाला- १००० ते १२००,
ओले बोंबील- १४० ते २००,
कोळंबी- २८० ते ४००,
वाम- ७५०,
जंबोप्रॉन्स- १४००,
किंगप्रॉन्स- ७५०,
लॉबस्टार- १४००
No comments:
Post a Comment