बंगळुरू - पहिला भारतीय उपग्रह आर्यभट्टची निर्मिती करणारे ख्यातनाम शास्त्रज्ञ उडुपी रामचंद्र राव यांचे सोमवारी बंगळुरूत निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. १९८४ पासून १९९४ पर्यंत ते इस्रोचे प्रमुख होते. कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील आदमपूर गावचे रहिवासी राव अंतराळ प्रकल्पाशी १० वर्षे जोडले गेले हाेते. राव यांनी १९७२ मध्ये उपग्रह तंत्रज्ञानाची सुरुवात केली. राव यांनी आर्यभट्टपासून मंगळ मोहिमेपर्यंतच्या अनेक योजनांना मार्गदर्शन व योगदान दिले.
साराभाई अंतराळ प्रकल्प सुरू करणाऱ्या टीममध्ये राव यांचाही सहभाग
राव यांनी बंगळुरूच्या पेन्या गावातील एका पत्र्याच्या घरात देशाचा पहिला उपग्रह आर्यभट्टच्या निर्मितीच्या कामास सुरुवात केली होती. एप्रिल १९७५ मध्ये सोव्हिएत रशियाकडे प्रक्षेपणासाठी तो सुपूर्द करण्यात अाला. केवळ ३६ महिन्यांत ही मोहीम फत्ते करण्यात आली होती. इस्रोचे माजी चेअरमन डॉ. के. कस्तुरीरंगन म्हणाले, उपग्रह कार्यक्रम एखाद्या जबाबदार व्यक्तीने सांभाळावा, अशी साराभाई यांची इच्छा होती. साराभाई यांनी त्यांना एमआयटीतून परत बोलावले आणि उपग्रह कार्यक्रमात काम करण्यास सांगितले होते.
डॉ. कलाम यांनी बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सांगितले होते की, ६० दशकाच्या सुरुवातीस प्रा. साराभाई यांनी भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमासाठी थुंबाची निवड केली होती. मात्र, ज्या ठिकाणी चाचणी करावयाची होती तिथे चर्च, शाळा, बिशपचे घर होते. चाचणीसाठी त्यांची परवानगी हवी होती. आम्ही सर्व त्या ठिकाणी सेटअप लावू इच्छित होतो. साराभाई यांच्यासोबत आम्ही सर्व फादरची भेट घेतली. त्यांनी पुढील रविवारी बोलावले. फादर चर्चमध्ये म्हणाले, इथे असलेली वीज, माइक सर्व विज्ञानाची देणगी आहे. त्यामुळे आम्ही या टीमच्या यशासाठी प्रार्थना करतो. यानंतर ते जागा देण्यास तयार होतात.

No comments:
Post a Comment