Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Friday, July 21, 2017

RJ चा मलिष्कावर भरोसा हाय ना...


मुंबई, दि.21-  गुड मॉर्निंग मुंबईईई.... जान्हवी (विद्या बालन)ने असं लांबलचक गुड मॉर्निंग केलं की मुन्नाभाई (संजय दत्त)च्या काळजाचं पाणी पाणी होई. त्याला वाटे हा आवाज ऐकत राहावं. कोणत्याही कामासाठी हातपाय न हलवणारा मुन्नाभाई आणि त्याचा मित्र सर्किट (अर्शद वारसी) सकाळीच रेडिओसमोर येऊन बसत... रेडिओ जॉकी असणारी ही जान्हवी सुंदर आहे, तिचा आवाज गोड आहे इतकं मुन्नासाठी पुरेसं होतं. तिचा प्रत्येक कार्यक्रम ऐकण्यासाठी तो धडपडायचा... हे सगळं लगे रहो मुन्नाभाई सिनेमातलं असलं तरी याच्यासारखे लाखो मुन्नाभाई रेडिओ ऐकत असतात. 
 
भल्या सकाळी घर सोडल्यावर रात्री परत घरी येईपर्यंत मोठ्या शहरातले तरुण लोकांच्या गर्दीत सापडलेले असतात. ते त्या गर्दीचा भाग असतात. या गर्दीत सापडलेल्या तरुणांच्या मनात त्यांच्या आयुष्याचे, घराचे, कुटुंबाचे, नोकरीचे, कर्जाचे विषय सतत घोळत असतात. एखाद्या यंत्राप्रमाणे ते बरोबर ठराविक जागी ठराविक स्थानकावर चढत-उतरत असतात. डोंबिवली फास्टमध्ये दाखवलेल्या सकाळी होणाऱ्या घड्याळाच्या गजरामध्ये त्यांचे दिवस पुढेपुढे जात असतात आणि दोन रविवारच्यामध्ये त्यांचे आठवडे जात असतात. येणाऱ्या रविवारकडे डोळे लावून आठवडा ढकलायचा हेच एक काम होऊन बसते. तेव्हा ही माणसं आणखी एकटी पडत जातात. मुंबईत कितीतरी लोक स्वत:शीच बोलताना आणि हसताना दिसतात. लोकलच्या प्रवासात, चालताना हे लोक स्वत:शी काहीतरी बोलत असतात, कधीकधी ते ऐकूही येतं पण ती बोलणारी माणसं त्यांच्याच धुंदीत बोलत राहतात. त्यामुळे गर्दीत सापडलेले असले तरी हे लोक एकटे आहेत हे समजत राहतं. मग ही माणसं स्वत:ला शहर नावाच्या यंत्राशी जोडून घेण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात.
आपल्याला एखाद्या कार्यक्रमाचा आनंद घेता आला नाही तरी किमान त्याची माहिती आपल्याला असावी असं त्यांना वाटत असतं. किंबहुना आताच्या माहितीच्या युगात एखादी गोष्ट आपल्याला माहिती नसणे हे स्पर्धेतून बाहेर फेकल्यासारखं त्यांना वाटत राहतं. त्यासाठी ते आपल्याला एखाद्या विषयात गती नसली तरी ती मिळवत राहतात. टीव्ही, मोबाइल, व्हॉटसअ‍ॅप, यूट्यूब, ट्वीटर, फेसबूक, इन्स्टाग्राम, वर्तमानपत्रांची अ‍ॅप्स या सगळ्यांशी ते स्वत:ला जोडून घेतात. कारण एखादा विषय किंवा सध्या चालू असणाऱ्या प्रवाहातील मुद्दा माहिती नसेल तर त्यावर व्हॉटसअ‍ॅपवर येणारे विनोदही समजत नाहीत. टीव्हीवरच्या मालिका पाहात नसलात तरी तुम्हाला राणादा, पाठकबाई, शितली, रावल्या यांची माहिती असावी लागते. त्यामुळे माहिती नसण्याचे अज्ञान झाकण्यासाठी ते सतत सोशल मीडिया वगैरे साधने वापरत राहतात. याबरोबर त्यांना सर्वात जास्त आधार वाटतो तो एफएम स्टेशन्सचा. लोकलच्या किंवा बसच्या प्रवासात, टॅक्सी-रिक्षात, घरी, चहा पिताना, जेवताना हेडफोनच्या वायर्स कानात कोंबल्या की काम झालं. आजूबाजूचं सगळं त्यांना विसरायला होतं. नेहमी ठराविक वेळेला लागणारे कार्यक्रम आणि ते सादर करणारे रेडिओ जॉकी यांच्याशी ते स्वत:ला जोडून घेतात. एफएम ऐकलं की सध्या ट्रेंडिंग असणाºया विषयाची माहिती त्यांना मिळते. सध्या बाजारात आलेले नव्या फॅशनचे कपडे, नवी हॉटेल्स, टीव्हीवरच्या मालिका, सिनेमा यांच्यापासून शहरातील गर्दी, ट्रॅफिकच्या जागा-वेळा, सण-समारंभ, कार्यक्रमांची माहिती ते एफएम ऐकत मिळवतात. ही माहिती लोकांना देण्यासाठी रेडिओ स्टेशन्स देखिल सतत अपडेट राहात असतात. लोकांना सध्या आवडणारे विषय कोणते, त्यांच्या चर्चेतील विषय यांची माहिती ते सतत मिळवतात आणि त्याचे प्रसारण करतात. असं हे विषयांचं, चर्चेचं, माहितीचं आदानप्रदान चालू राहतं. 
 
गेल्या दोन महिन्यांमध्ये सोनू तुझा मायावर भरोसा नाय का हे गाणं तरुणांमध्ये पुन्हा प्रसिद्ध झालं. (खरतर हे गाणं जुनाट म्हणावं इतकं जुनं आहे, मुलांच्या कॅम्प, सहलींमध्ये ते म्हटलं जाई) अत्यंत टुकार आणि अर्थहिन अशा या गाण्यामध्ये एकदम साधे यमक आणि ठेका धरता येत असल्यामुळे आता नव्याने सगळ्यांच्या तोंडामध्ये बसलं. आपापल्या ग्रुप्सना फेसबूक लाइव्हवर आणायची नवी संधी या गाण्यामुळे मिळाली. प्रत्येक वर्षी एखादे गाणे प्रसिद्ध होते आणि त्याची त्या वर्षात भरपूर चर्चा होते. त्या गाण्यावर का़र्यक्रम होतात गणपतीमध्ये नाचण्यासाठी त्या गाण्याला सर्वाधीक पसंती असते. मग ही गाणी जशी येतात तशी ती निघूनही जातात. शांताबाई, सैराट या गाण्यांचंही तेच होतं. एकेकाळी कोलावरी डी या अगम्य, निरर्थक गाण्यावर सगळे लोक तुटून पडले होते. आपण तुटून का पडतोय हे कोणालाही सांगता येणार नाही इतकं ते विचित्र गाणं होतं. आज त्या गाण्याची आठवण करुन द्यावी लागतेय इतकं ते आपल्या विस्मृतीमध्ये गेलंय. या सोनूचंही तसंच झालं असतं आणि काही काळाने होईलही. पण आरजे मलिष्काने ते गाणं उचललं आणि या गाण्याचा आपल्या इथला प्रवास लांबला. मुंबईत दर पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मलिष्काने या गाण्याचा वापर केला.
 
मुंबई तुझा बीएमसीवर भरोसा नाय का
मुंबईच्या रस्त्यांमध्ये झोलझोल
रस्त्यातले खड्डे कसे खोलखोल
खड्ड्यांचा आकार कसा गोलगोल 
तिनं असं या गाण्यातूनच खड्ड्यांकडे लक्ष वेधून घेतले त्यापुढे मुंबईचा माणूस झाला बेहाल, यहीच लफडा हरसाल, पावसात अथॉरिटीची पोलखोल, मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का असा प्रश्नही विचारला आहे. आता हे साधं गाणं असलं तरी तिनं मांडलेला विषय आजिबात चुकीचा नाही असं हे कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये सहज येऊ शकतं. मुंबईत पावसाळ्यात होणारे ट्रॅफिक जाम, खड्डे, थोडाही पाऊस झाला की पाणी साचून रेल्वेमध्ये येणारे अडथळे प्रत्येक वर्षी अनुभवता येते. मग ते गाण्यातून सांगितलं तर काय बिघडलं असा प्रश्न मलिष्काचे चाहते आणि गाणं ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये आला. पण मुंबई महानगरपालिकेने तिनं मांडलेल्या प्रश्नांवर विचार करण्याऐवजी तिला त्या गाण्यापेक्षा अत्यंत टुकार गाण्याची निर्मिती करुन उत्तर दिलं. थोडं सवालजवाबसारखं वातावरण तयार होतंय तोपर्यंत पालिकेचे अधिकारी तिच्या घरी येऊन पोहोचले आणि तिच्या घरात डासांच्या अळ्या सापडल्या असे सांगत तिला नोटीस बजावण्यात आली. आता या अळ्या शोधणं त्यांच्या कामाचा भाग असला तरी त्यांनी नेमकी आताच केलेल्या तपासणीच्या वेळेवर सहजच शंका घेतली जाऊ शकते. तिने गाण्यातून खड्ड्यांचा प्रश्न मांडणे आणि त्यानंतर लगेच काही दिवसात पालिका अधिकाऱ्यांनी तिच्या घरात तपासणी करणे हा योगायोग आहे हे स्वीकारणं जड जाणार आहेच. बीएमसीमधील सत्ताधारी एवढ्यावरच थांबले नाही तर एका नेत्याने बीएमसीची मानहानी झाली असा ठपका ठेवून तिला पाचशे कोटींची नोटीस बजावण्यात यावी अशी सूचना केली आहे. खरंतर मलिष्काचं गाणं काही दिवसही लोकांच्या ओठांवर किंवा कानामध्ये राहिलं नसतं. पण अशा विचित्र विरोधामुळे हे प्रकरण वाढत गेलं. मलिष्काच्या गाण्याचं आयुष्य वाढलं. पण गाण्यातील प्रश्नाकडे लक्ष न देता तिच्यावर केलेल्या कारवाईमुळे लोकांचा तिलाच जास्त पाठिंबा मिळतो असं सोशल मीडियावर दिसत आहे.

No comments:

Post a Comment